शोधतो मी वाट एक ती
माणसांना जोडणारी
वेगळा ना गली मोहल्ला
जात धर्मास खोडणारी
भेदभावना पुसुनी रेषा
नांदू सारे सौख्यभरे
मनीं जागवू माणुसकीला
राग, द्वेष ना कुठे उरे
नको हलाहल वैरत्वाचे
प्रेम, शांतीचा मार्ग खरा
देश भावना ठेवू जागृत
वीरांना त्या नित्य स्मरा
कोंदटलेले धुरकटलेले
मळभ पोसले सभोवरी
गुंतलेली गाठ उकलूनी
हृदये जोडू आता तरी
मातृवेल ती एक आपुली
सुंदर सुमने किती गोजिरी
रंग, गंध जरी असे वेगळा
एकची होती माळ सरी
हवी कशाला चौकट आता
बंधुत्वाला नको उंबरा
उघडून द्वारें बंद मनाची
उजळून जावो मनः गाभारा
©Shankar kamble
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here