Amita

Amita

poet

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीकविता #राधा  White कैफियत राधेची.........

कान्हा रे कान्हा मी आले अवचित
अवतरले उतार वेळी तुझिया द्वारकेत

आगंतुक भासे जरी माझी भेट
निवडक प्रश्न काही विचारेन थेट...
प्रश्न विचारणे तर केवळ निमित्त..
मनी शेवटले कोरून घेण्याचे हट्ट...

यमुनेच्या किनारी, ते कोवळे मन
बागडले धुंद बावरी, तुझीच होऊन
आता तरी टिपूदे, तुला काही क्षण
आठवांची शिदोरी, मनसोक्त घेऊन....

कालिंदीच्या तटावरी, ते मंतरलेले दिन
कंकणांचे सूर, अन् पैजणांची किणकिण
वेणुचा आरव, अन कुंजवनी रासरिंगण
ओशाळून मी उभी, तुलाच लीन होऊन....

गोकुळ मागे सरले, मीही माझी न उरले 
थकली सारी गात्रे, अन दिवसही ओसरले 
शेवटली भेट तुझी, घ्यावी असे  ठरविले
परी बळ सारे देहाचे, हृदयी मी एकवटले....

भेटलास आज जेव्हा, बासुरी नव्हती
म्हटलास कसा, ती तुझीच खूण होती
पुन्हा कधी अधरी, वेणू विसावली नाही
जणू माझ्याचसाठी ती निनादली होती....

ही रात्र द्वारकेची, मनी भावनांचे उमाळे
भेटीस येऊदे परी, माझे  गोकुळ पुराणे
बोलुदे आता मज, मनसोक्त भरभरून
घेउदे मज एकदा, कृष्ण शेला पांघरून

बघ उत्तररात्र सजली, उरले किती क्षण
तुझा वियोग श्रीहरी, या क्षणी अटळ 
हाची अंतिमक्षण, स्मरणात साठवून
मनी हीच खूण, आता जन्मभर जपेन....

हात सोडून कान्हा, गेलास तू निघून
नेत्रात आता तुझे, केवळ चित्र स्मरून
कधीच झाली केशवी, अंतर्बाह्य परिपूर्ण
तेवते श्रीराधा, तुझ्यात विलीन होऊन....

अमिता

©Amita

#राधा मराठी कविता

171 View

 White मनात जपलेल्या खुणांची, साक्ष तू देशील का?
लपंडाव नको आता, साक्षात तू येशील का?

श्रावणी कोवळी उन्हे, मनी चित्र चांदणे, 
तुझी आठव सखे, रिमझिम पाऊस गाणे..

गुंतता सखे सांजेला, आळवतो गीतमंजिरी
तुझ्यात रमताना सुचे, काव्यमाला अंतरी..

सरतात कैक दिनरात्री, बहरही नित्य ओसरतो.
व्याकुळ मेघ नभातूनी, जीव ओसंडून बरसतो..

तुझी सय केवळ आता, उरी बाळगून वावरतो
मुक्या व्यथा अंतरात, अविरत  झुरत रहातो..

अमिता✍️

©Amita

#मराठीप्रेम #मराठीकविता

153 View

 उधळलास पारिजात तू माझ्या अंगणी
फुले वेचिता टिपले मी चांदणे त्या क्षणी..

आताशा मी गाते केवळ प्राजक्ताची गाणी
आठवणींचा माग निव्वळ उरला ध्यानीमनी..

अमिता✍️

©Amita

#पारिजात #मराठीकविता

153 View

#मराठीकविता #पाऊस  White पाऊस💦💦

उगाच रिते का मन हे आतुर
वर्षा आगमनाची लागे हुरहूर.....
पाऊस येता अवखळ, अल्लड
तृप्त झाले मन हे चंचल....

वलयांकित नक्षीच्या रेखा 
उमटून गेल्या जळात पळभर....
वृक्षवेलींवर पाचूंची उधळण
अन् इंद्रधनुचे त्यावर कोंदण....

बिंदू अनामिक बुजरे क्षणभर
प्रवाहात ओघळती
जळात उमटले गगनाचे प्रतिबिंब
धरेच्या मिलनासाठी....

उंच तरुवर भिजूनी पक्षी
निवांत क्षण वेचती....
मध्येच फडफड, भिरभिर करिती
थेंब शिंपण्यासाठी....

उभ्या उभ्या सरींचा जणू
आरव घुमतो कानी
सप्तसुरांची मैफल जमते
नक्षत्रांच्या अंगणी....

ओल्या ओल्या मातीचा
गंध भरतो अंतरी
जणू कोमेजल्या मनाला 
लाभावी संजीवनी....

उमलून येई भाव मनीचे
जलधारा पाहताक्षणी
उमटून जाती अविरत शब्दांचे
काव्य लेखणीतूनी
काव्य लेखणीतूनी।।

अमिता🖋️

©Amita

#पाऊस

180 View

 वाद-संवाद 

जिथे पेटतो वाद, तिथे संपतो संवाद
शब्दांची होते झुंज, टोकाचा होतो नाद....

अपेक्षांचा सलतो भार , आक्षेपांना येते उधाण
शब्दांनीच होतो वार, हरवतात मान- सन्मान....

अनावर अश्रूंचे निर्झर , स्त्रवतात पुन्हा झरझर
विरून जाता तो अंगार, मनावर फुंकर अलवार....

आयुष्याच्या सांजवेळी, गिळून टाक मीपण
मनात उरलेला संदेह , सोडवू प्रेमाने आपण....

अमिता✍️

©Amita

#StandProud #मराठीकविता

144 View

 घन दाटून यावे..

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
मनातील किल्मिष जसे ओघळावे....

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
व्याकुळ मनाचे बांध फुटावे....

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
ओशाळल्या धरेला बिलगून जावे....

घन दाटून यावे अन् बरसुन जावे
भान विसरुनी चिंब भिजून जावे....

घन दाटून यावे अन् बरसुनी जावे
सर्व पाशांतूनी  ऋणमुक्त व्हावे.....

अमिता🌸✍️

©Amita

#rain #मराठीकविता

189 View

Trending Topic