Unsplash नुकतेच पंख फुटलेल्या माझ्या छोट्याश्या चिमण्यांनो,
थोड्याच दिवसात अशा भुर्रकन उडून जाल
रिकाम्या खोल्यांत आणि इथल्या गोंधळातही
अनेकदा मला तुम्ही वावरताना दिसाल
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत
लहान मोठ्या गोष्टीखातर मारलेली हाक,
बाहेर जाऊन आलो तरीही खाऊ नाही आणला
म्हणून उगाचंच रागाने फुगलेलं नाक
गप्पा मारत केलेलं मॉलिश आणि स्किनकेअर
तेव्हाच आपण टिपलेले ते विचित्र असे फोटो
गाण्यांच्या मैफिली आणि उशांची मारामारी
आता जेव्हा जेव्हा पाहते तेव्हा आनंद होतो
भल्या पहाटे आपोआप बंद झालेला पंखा
आणि अंगावर ओढलेलं ऊबदार असं ब्लँकेट
बऱ्याचदा सहजंच म्हणून दिलेलं लाल गुलाब
आणि वाढदिवसाला दिलेली ती सुंदर अशी भेट
कळत नकळत केलेल्या या प्रेमाच्या गोष्टी
अनोळखी जागेला असं घर बनवून राहिलात
मायेने सामावून घेऊन आणि होऊन
कळलेच नाही केव्हा इतक्या जवळच्या झालात
म्हणूनच सोबत देत आहे शुभेच्छा तुम्हाला
आकाशाकडे उंच उंच भरारी घ्याल
कवेत येतील स्वप्ने सारी आजवर पाहिलेली
एक दिवस नक्की ती पूर्णत्वाला न्याल
आणि तुम्हालाही आठवावेत हे दिवस केव्हातरी
भविष्यात जेव्हा केव्हा मागे वळून पहाल
वेळ काढून पुन्हा जमाल, न जमाल
पण नक्कीच या दिवसांच्या आठवणीत रमाल...
पण नक्कीच... या दिवसांच्या आठवणीत रमाल
©Anagha Ukaskar
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here