मला स्वप्नात दिसले गाढ मी झोपेत असताना
अहो मी पाहिले प्राण्यांस त्या एकत्र जमताना
मला दिसली सभेला फार गर्दी सर्व प्राण्यांची
गहन चर्चा सभेमध्ये कशावर चालली त्यांची
किती प्राणी किती पक्षी तिथे झाडून जमलेले
सभेसाठीच होते सर्व ते रांगेत बसलेले
कुणी मग बोलले रागात प्राणी जोरजोराने
कसा माणूस जगतो आंधळा होऊन स्वार्थाने
नियम ना पाळतो कुठले करी विध्वंस सगळ्याचा
किती तोडून झाडांना घडवतो ऱ्हास रानांचा
म्हणे गाढव कुणा कुत्रा शिव्या माणूस देताना
मनाला वेदना होते उगा ऐकून घेताना
किती होतो मनाने लालची माणूस स्वार्थाने
मुक्या प्राण्यांस इतका त्रास का द्यावा बरे त्याने
उगा हत्या किती करतो बघा माणूस प्राण्यांच्या
किती होऊन गेल्या नष्ट जाती आजवर त्यांच्या
सभेच्या शेवटी ठरले इशारा ठाम देण्याचे
तुझे हे सत्र थांबव तू जरा विध्वंस करण्याचे
ठरवले सर्व प्राण्यांनी नियम जर पाळले नाही
इथे राहील का समतोल बाकी सृष्टिचा काही
©जितू
#Thinking