White *✨ लाल परी आणि माझे UPSC चे दोन वर्ष ✨*
रोज सकाळी ती लाल परी बस स्टॅंडवर मला भेटायची,
कधी वेळेत, कधी लवकर, कधी खुप उशीर करायची...
डोळ्यात स्वप्न घेऊन मी तिच्या मागे धावत राहायचो,
तिची वाट बघायचो, आणि तिच्याच शोधात राहायचो...
ती गाडी झटके घेत पुढे, माझं मन मात्र विश्रांती घ्यायचं,
रोज तिच्या कुशीत मनमोकळे पणे समदं जग फिरायचं...
आधी तिचा करकर आवाज डोक्याला ताण वाटायचा,
पण नंतर, तिच्या आवाजाचा गारवा काळजाला भिडायचा…
पहिल्या वर्षी ती केवळ एक गाडी वाटायची,
पुस्तकांच्या डोंगराखाली लपलेली माझी स्वप्ने दिसायची...
इतिहास, भूगोल, राजकारणाच्या गल्ल्यांत मी हरवायचो,
आणि ती लाल परी, रोजच्या धावपळीतून माझ्या मनात मी उतरवायचो…
दुसऱ्या वर्षी मात्र ती जणू माझी साथीदार भासायची,
प्रत्येक यश - अपयशाच्या साक्षीला तिच्या इंजिनची सोबत असायची...
रात्रीच्या अभ्यासाच्या थकव्याला तिच्या ब्रेक लाइटचा लाल रंग सोबत असायचा,
"थांबू नकोस, धावत रहा, मी सोबत आहे" असं तिच्या बोलण्याचा भास व्हायचा...
त्या दोन वर्षांत माझा दिवस तिच्याशिवाय अपूर्ण वाटायचा,
जणू तिचा साथ UPSC च्या प्रवासाचा अविभाज्य घटक वाटायचा...
आणि जेव्हा थकून मन कधी माझे हतबल व्हायचे,
तेव्हा मला तिचे रोज नव्या प्रवासाचे नवे धडे आठवायचे…
लाल परी म्हणजे फक्त गाडी नव्हती,
ती माझ्या संघर्षाची मूक साक्षीदार होती,
परीक्षा देताना मनात एकच विचार “जिंकून परतेन,
आणि त्या लाल परीला पुन्हा एकदा नक्कीच भेटेन…
कारण लाल परी आणि माझ्या UPSC च्या दोन वर्षांची गोष्ट,
ही फक्त प्रवासाची नव्हती, तर स्वप्नांच्या पाठलागाची होती…
©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here