White छोटेसे हे गाव आमचे नदीकिनारी वसलेले
सभोवताली लक्ष ठेवण्या डोंगर असती बसलेले
सायंकाळी नदीकिनारी आवडते मज फिरायला
जाउन तेथे जरा एकटे झाडाखाली बसायला
नसतो कोलाहल कुठलाही शांत वाटते खूप इथे
अनेक वेळा डोळे मिटुनी बसुन राहतो मीच तिथे
कानावरती पडतो केवळ खळखळाट त्या पाण्याचा
सुखद वाटतो थंडगार मज स्पर्श वाहत्या वाऱ्याचा
अंतर थोडे चालुन जाता मंदिर आहे स्वामींचे
सायंकाळी तिथे चालते कीर्तन त्यांच्या नामाचे
रोज आरती असते तेथे मेळा जमतो भक्तांचा
ऐकू येतो नाद दूरवर मंदिरातल्या घंटांचा
सुंदर दिसतो परिसर सारा मावळतीच्या किरणांनी
किती वेळ मी पहात बसतो दृश्य मनोहर नयनांनी
एक वेगळी गूढ आर्तता मनास माझ्या सुखावते
पुन्हा पुन्हा येण्यास इथे मन मलाच माझे खुणावते
©जितू
#GoodMorning