White *✨ कला शाखेतलं प्रेम...✨*
तिच्या डोळ्यांतला गहिरा इतिहास मला रोज भूतकाळात घेऊन जातो,
त्या नजरेच्या सामर्थ्यात पराक्रमी लढवैय्यांचं जीवन मला दाखवितो...
तिच्या हसण्यातलं पेशवाईचं वैभव आजही मनात दरवळतं,
आणि माझं प्रेम, त्या इतिहासा सारखं तिच्या प्रेमात अडकतं…
भूगोलाच्या वर्गात जेव्हा ती सुंदर नकाशा काढायची,
माझ्या हृदयाचा केंद्रबिंदू नेहमी तिच्याभोवती फिरायचा,
तिच्या अस्तित्वाच्या अक्षवृत्तावर माझं मन कधी थांबायचं नाही,
पण तीच माझा सूर्योदय, आणि तिच्यातच माझा सूर्य मावळायचा…
समाजशास्त्राच्या तासाला ती नेहमी समाज बदलायचं स्वप्न पाहायची,
आणि मी मात्र तिच्या मनात फक्त एक छोटंसं घर माझं बघायचो,
तिचं तत्त्वज्ञान, तिच्या विचारांची जडणघडण मला कळायचं नाही,
माझ्या प्रेमाच्या संविधानात तिच्या होकाराची एकच कलम मी शोधायचो…
नागरिकशास्त्र शिकताना ती म्हणायची, "प्रत्येकाला हक्क मिळायलाच हवेत,"
माझा एकच हक्क होता, तिच्या हृदयातली जागा आपण मिळवायची,
आणि तिनं तो हक्क मला दिला, न बोलता, न मागता, न घाबरता,
प्रेमाच्या संविधानात तो न्याय लिहिला गेला, आणि ती झाली माझी कायमची…
मराठीच्या वर्गात ती ज्या ओळी मनापासून गुणगुणायची,
त्या शब्दांच्या सरीत चोरट्या नजरेने मी चिंब भिजायचो,
आणि इंग्रजीच्या कवितांमध्येही तिचंच रूप दिसायचं,
‘You are the reason my heart still beats’ मनात तिचं वाक्य घोळायचं…
कला शाखेतले सगळे विषय आता सहज सोपे वाटत आहे,
पण प्रेमाचं गणित अजूनही सुटलं नाही, बहुतेक तीच उत्तर, तीच प्रश्न आहे,
शाळेच्या त्या पुस्तकांत कितीही डोकं जरी मी खुपसलं,
आयुष्याचं एकच सत्य कळलं, माझ्या अभ्यासाचा विषय फक्त तीच आहे…
कारण प्रेम म्हणजे सर्व विषयांचं एक एकत्रित पाठ्यपुस्तक आहे,
ज्यात *‘ती’* हे शीर्षक, आणि *‘मी’* त्याचा अभ्यासक आहे...
©मयुर लवटे
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here