White **भूक***
इंधन नसतानाही पोटाला आग लावणारी,
झळ नसतानाही चटके देणारी,
शब्द लहान पण व्याप्ती महान,
शब्द दोनच पण गाथा महान,
रोटी, कपडा, मकान या मूलभूत गरजांतही
तिचेच अग्रस्थान.
कोण आहे ती?
तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई......
नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या बाळापासून
मृत्यूस आलिंगन देण्यास सज्ज झालेल्या
वयोवृद्धांपर्यंत, सर्वांनानिकट असणारी.
गरीबांच्या वस्तीत तिच्यामुळेच मारामारी,
भिक्षुकांना तिच्यामुळेच पळापळी.
कोण आहे ती?
तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई........
कोणाला अन्नाची,तर कोणाला पैशाची,
कोणाला खुर्चीची,तर कोणाला कीर्तीची,
कोणाला सत्तेची,तर कोणाला विद्येची.
सारे तिच्याच मागे!कोण आहे ती?
तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई.......
तिच्यामुळेच माणूस कधी बनतो,तर कधी बिघडतो.
कधी लढतो, तर कधी लढवतो.
कधी झुंज देतो, तर कधी झुरतो.
कोण आहे ती?
तीच ती, सर्वांची ताई — भूक ताई.......
©Sudha Betageri
#Sudha