* शब्द होऊनी टिपकत जाते*
मी फक्त मनातील काहूर
कागदावर चितारत जाते
मी म्हणताच नाही कधी
की मी सुरेख कविता लिहिते ।।।धरू।।
मनाच्या परिघात अगणित
घडत असतातच ना गोष्टी
शब्द शलाखांचा मारा झेलत
मन होतेच असते ना कष्टी
ती घालमेल तो कोलाहल
मी फक्त कागदावर बांधून ठेवते ।।१।।
नारी म्हणून असलेली बंधने
कधी घेते खुबीने सांभाळून
कधी बंडाची मशाल पेटवून
मीच घेतेय भवताल उजाळून
फक्त बाईपणाच्या अस्तराला
मी पेनाने टाके घालत बसते ।।२।।
कोण राजकुमार अवचित
काळजात महाल बांधून घेतो
प्रेम त्याग अन विश्वासाचे तो
रंग मजवरी बरसून घेतो
मन बावरे रंग मखमली
हलके हलके शिंपत बसते ।।३।।
पोरं चिमुकली हात पसरती
सिग्नलवरती व्याकुळ होऊन
कचऱ्यातील उष्टे ,शिळे नासले
भूक निरागस घेते सारे वेचून
त्या डोळ्यातील मूक वेदनाशी
मी ही जरा जराशी बोलत असते ।।४।।
अतिवृष्टीने पिके सडती तर
कुठे दुष्काळाचा फेरा येतो
लेक लग्नाची घरात असते
पोर शिकले परी वशिला नसतो
अन्नदात्याच्या काळजाची सल
शब्द होऊनी टिपकत जाते ।।५।।
सौ.प्रतिभा मगर
दि.२१/२३/२३
©सौ.Pratibha मगर
#Likho शब्द