मरगळ गुंतलेल्या भावनांची, मनातच आज ठेऊन ये,
शेवटच्या भेटीला आपल्या, एक सूर्यास्त घेऊन ये...
समुद्रकिनारी तुझ्या, हातात हात देऊन,
विसरायचंय मला, जे जपलंय मनात ठेऊन,
त्याचवेळी पाण्यात, दोघांची पावलं भिजावित
वाळूसकट त्याखाली, पाहिलेली स्वप्न निजावित,
अंधार होत असताना, तू करावीस निघण्याची घाई,
एकटं जावं लागेल तुला, मी आज सोबत नाही,
तेव्हा कुठेतरी व्हावा, हृदयावर घातक वार
पावलं दूर जात असताना, कोसळावी अश्रूंची धार,
निघताना मात्र त्या सागराला, सारं काही देऊन ये,
शेवटच्या भेटीला आपल्या, एक सूर्यास्त घेऊन ये...
स्वप्नील हुद्दार
.
©Swapnil Huddar
#SunSet