White आई गं,
उद्या लग्न आहे माझं,
खूप घाल-मेल होतेय गं मनात,
होईन का परकी मी ह्या घराला, लग्न लागल्या क्षणांत ?
मीच निवडलाय माझा नवरा,
चांगला वाटतोय सध्या, मलाच जबाबदार धराल का,
जर वाईट वागला उद्या ?
तू म्हणालीस, "सासुबाईंना तू तुझी आईच समज,"
वाटतं का गं तुला ते इतकं, सोप्पं आणि सहज ?
पुसू शकेन का त्यांच्या पदराला,
मी माझे खरकटे हात,
भरवतील का आजारपणात,
त्या मला मऊ मऊ भात ?
माहेरी येईन तेंव्हा करेन का राज्य मी माझ्या खोलीवर घुसून ?
का मी गेल्या गेल्या टाकशील
माझ्या सगळ्या खाणा-खुणा पुसून ?
येईल का माझी आठवण तुला
जेंव्हा करशील नारळाची चटणी,
विसरता येतात का गं कधी, दैनंदिन आठवणी ?
तुम्हाला वाटते तितकी कणखर नाहीये मी अजून,
मनातला गोंधळ लपवण्यासाठी बसलीये सजून-धजून.
आई ह्यातलं काहीच मला तुला येणार नाही सांगता,
बघ ना किती मोठी झालेय,
तुझ्या अंगणात रांगता-रांगता !
घेऊन चाललीये मी माझ्या आवडीची उशी आणि दुलई,
अंगणातलं चाफ्याचं झाड मात्र कधी तोडू नकोस गं आई.
जेंव्हा जेंव्हा त्या झाडाखाली, तू उभी राहशील,
फुलांच्या मंद वासांतून तू पुन्हा मला अनुभवशील.
सुखानी म्हणो, वा दुःखाने
कधी माहेरी ही पोर आली,
असु दे तिच्यासाठी जागा,
त्या चाफ्याच्या झाडाखाली.......!
©विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here