आकाशाच्या पटांगणात
जमले सारे ढग
काय असेल विषय त्यांचा
ऐकू जरा मग ...
काही ढग करत आहेत
उपोषण
काळ्या ढगांसारखे त्यांना हवे
आरक्षण..
काहींना हवा आहे
वाढवून भत्ता
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे म्हणे
सारखा बदलतोय पत्ता ...
नको आहे काहींना
सूर्याचे सरकार
बसत आहेत त्यांना
चटकेच फार ...
चंद्राच्या पक्षाला
आहे 'ढग'मत
पण सूर्याच्या लख्ख कारभारापुढे
त्यांचे काहीच नाही चालत ...
काहींच्या मते बदल्यांमध्ये
चालू आहे भ्रष्टाचार
ठरावीक जागांसाठी 'काळ्यां'नी
केलाय खर्च फार ...
ऐकून साऱ्या गोष्टी
मी झाले चकीत
आपल्यासारखे त्यांचेही
सगळेच प्रश्न थकीत ...
- वीणा
©Rajeshwari Ghume
#Earth_Day_2020