पराचा कावळा
(भुजंगप्रयात /२०/लगागा/४)
किती झूठ हा सोहळा होत आहे
पराचा जणू कावळा होत आहे
मिळाला दगा आजपर्यंत कारण
भरवसा तुझा आंधळा होत आहे
इडीचा दरारा विचारात घेता
गजाचा झणी मुंगळा होत आहे
नको माणसा द्वेष पोटात ठेवू
विषारी उरी कोथळा होत आहे
विचारा जरा मुंबईच्या मनाला
वडापाव का ढोकळा होत आहे
मदतगार झाले बुरे म्हणविणारे
भल्यांचा मला अडथळा होत आहे
खयालात रुजल्या जशा वृत्त-मात्रा
गझल साधनेचा मळा होत आहे
सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. उमरखेड जि यवतमाळ
©Satish Deshmukh
पराचा कावळा
#Mountains